एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Facebook

वेणूताई चव्हाण.. यशवंतरावांचा भावगड

''सदू तू  जेवून घे रे, मला काही भूक नाहीये.'' 

''साहेब आहो वाईच ऐका कि आमचं बी.'' 

''आता तुमचच तर ऐकायचंय बाबा. पण आज काही जेवण जायचं नाही मला.'' 

"असं करू नाही मालक मी ताट वाढून ठेवलया, मोठ्या आईनी काय सांगितलं होतं इसरले का तुम्ही?, असं थाळ तरसवून ठिवू नाही, या नोकराचं म्हणनं ऐका आत्ता.''

''अरे सदू माझ्या बारक्या भावा प्रमाणे तू जन्मभर इथं माझं घर संभाळलं आणि आज तुही अशी परक्याची वागणूक देतोयस." 

"साह्यब आमच्या वहिनीसाहेब असत्या तर त्यांनी तुम्हाला असं वागू दिलं असतं का ओ. वर्ष झालं कि आज त्या गोष्टीला अजून किती दिस असं वागायचं म्हणतो मी ?"

साहेब काहीच बोलले नाहीत. आपला हात धुवायला उठत साहेबांनी आपलं स्वयंपाक घर घाटलं. मेजवर दोन ताटं लावून ठेवली होती. साहेब क्षणभर स्तब्धच झाले. एक तर कधी घराच्या या भागात एकट्याने बसलेले त्यांना आठवत नव्हते. आणि आज सोबत करण्यासाठी आपली सहचरणी नसून. बारक्या भावासमान आपला गडी सदू होता. 

साहेबांना आपल्या हातानी खुर्चीवर बसवत सदूने समोर मांडून ठेवलेले थाळ पुढे केले अन त्यांनी आपला पहिला घास तोडेपावतो तो जागचा हललाच नाही. घरातल्यांप्रमाणेच एक असणाऱ्या या सदूला देखील करारीपणाची सवय होती म्हणावी लागेल. एखादं धोरण देशभर राबवायचं म्हटल्यावर साहेब ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवत हीच रीत वेणूताईंनी आणि आता त्यांच्या पश्चात सदूनं अवलंबली होती. कसंबसं जेवण उरकून साहेब पुन्हा विश्रांती अन एकांतासाठी आपल्या खोलीत गेले अन पुन्हा आपल्या भावविश्वात मश्गुल झाले...

शून्यातून सुरवात केली, अन त्याला पूर्णत्व देण्यासाठी आई पाठोपाठ आपली सहचरणी अशी समजूतदार लाभली म्हणून नशीब. नाहीतर मुंबई, दिल्ली, परदेश वाऱ्या करता-करता आमचा काय संसार होणार होता देव जाणे. 

माझ्यापेक्षा तशी वेणूच मोठी करारी म्हणावी लागेल. "लग्न करीन तर देशभक्ताशीच" तिने हा तिचा आग्रह कधीच सोडला नाही. १९४२ चा तो काळ तिकडं युरोपात दुसरं महायुद्ध त्याच्या शेवटच्या अवस्थेत येऊन पोहचलं होतं. सगळ्यांनाच त्याची झळ बसली होती, आपल्यावर राज्यकर्त्या इंग्रजांनाही, त्यामुळे आता इंग्रज इथे काही जास्त काळ तग धरू शकणार नाही, हि बाब साऱ्यांच्याच ध्येनात येत होती, त्यानुसार जिथे तिथे स्थानिक पातळीवर मोठमोठे उठाव होत होते, काय दिवस होते ते आणि त्याच दिवसांत देशकार्य करताना घरही सांभाळायचं असतं अशा कानपिचक्या मिळत घरच्यांनी लग्न लावून दिलं, आणि २ जून १९४२ ला वेणू माझ्या आयुष्यात येती झाली.

काय म्हणून सांभाळलं नाही तिनं. माझं असणं, नसणं, माई सारं काही तिच्या समजूतदार पणाने पार पडले म्हणावे लागेल. 

नाहीतर मी असा देशाला वाहिलेलो, माझ्या मागं माईचं आणि तिच्या विचारांनी माझं काय होणार होतं तेव्हा. वेणू होतीच खमकी तिनं मोठ्या जिद्दीनं आपला संसार रेटला, मी देशाची सेवा करत होतो, पण तिनं माझ्यापाठी सार काही सांभाळून घेतलं. आयुष्यभर माझ्या संसारात रमली आणि माझं आयुष्यच व्यापून टाकलं तिनं. पण तिच्या अशानं जाण्यानं तिनं माझ्यातील लेखक कायमचा मारून टाकला. दिल्लीत असताना तिचं विश्व म्हणजे मी आणि मी तिथं नसताना अगदी चपराशांच्या बायांसह तिनं स्वतःला सांभाळून घेतलं, पण कधी कुठली तक्रार म्हणून केली नाही. हा एक तक्रार मात्र तिची नक्कीच होती. "तुम्ही तरुण आहात, अजूनकाही वय गेलं नाही. तुम्हाला वंशाचा दिवा हा हवाच, मी हि अशी त्यामुळे तुम्ही दुसरे लग्न करा. पण कशीबशी तिची समजूत काढून माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी एवढंच आम्ही आमचं विश्व बनवलं. होतं 

तिच्यासोबत निवांत वेळ घालावण तसं आभावानेच घडलं. नाहीतर आमच्या एकमेकांशी जास्तीच्या गप्पा या पत्रातूनच घडत. मीपण असा हुशार म्हणायला पाहिजे का कधी दिल्ली तर कधी मंत्री मंडळ अगदीच काय तर विदेश दौऱ्यावर असतानाच्या गमती जमती अन माहिती तिला सांगत बसायचो, पण ती त्यातही माझ्याशी दिलखुलास संवाद साधत असे. सगळं काही अगदी मनासारखे चाललं होतं. आणि आता ती वेळ आली होती जेव्हा आम्ही फक्त एकमेकांना वेळ देऊ शकणार होतो. पण काय हे नियतीचे भोग म्हणायचे.....!"

मे १९८३ च्या शेवटच्या आठवडय़ात वेणूताईंनी अंथरुण धरले. ते काही पुन्हा सुटलेच नाही. पण सारं काही अनपेक्षितच होतं. २ जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. यानिमित्ताने वेणूताईंचे भाऊ-भावजय, पुतणे दिल्लीत आले होते. १ जूनला सकाळी नोकराला बोलावून त्यांनी उद्यासाठी काय काय आणायचे याची यादी आणि पैसे त्याला दिले. चपराशांच्या बायकांना बोलावून त्यांनी करावयाची कामे सांगितली. 

साधारणत: साडेदहाच्या सुमारास दवाखाना, अ‍ॅम्बुलन्स वगैरे गोष्टी त्यांच्या कानावर येऊ लागल्या. आपल्याला आज दवाखान्यात हलवणार असल्याचं त्यांना जाणवलं. यशवंतरावांना त्यांनी जवळ बोलावून- ‘तुम्ही मला दवाखान्यात ठेवणार आहात का?’ असं विचारलं. ‘घरी उपचार करणं आता शक्य नाही..’ असं यशवंतरावांनी म्हणताच त्या म्हणाल्या, ‘मला हो की नाही, एवढंच सांगा.’ यशवंतरावांनी ‘हो’ म्हणताच काही सेकंदातच सकाळपासून हसत-खेळत, उत्साहात असलेल्या वेणूताई यशवंतरावांच्या अंगावर कोसळल्या आणि त्यांच्या कुशीतच त्यांची प्राणज्योत मालवली. १ जूनला सायंकाळी त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. २ जून १९४२ साली सवाष्णीचा साजशृंगार करून वेणूताईंनी चव्हाणांच्या घरात प्रवेश केला होता आणि बरोबर२ जून १९८३ रोजी तो उंबरठा ओलांडून त्या दूरच्या प्रवासाला निघून गेल्या. फरक एवढाच होता, की यावेळी प्रथमच यशवंतरावांच्या मागे चालण्याची प्रथा मोडून त्या पुढे आणि यशवंतराव मागे होते.

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter