एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: partapworldschool

जात,धर्म,राजकारण आणि भगतसिंह

जात,धर्म,राजकारण आणि भगतसिंह


आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.

वयाच्या 20-21 व्या वर्षी 'राष्ट्रनिर्माण कसे करावे?' याबद्दल साऱ्या भारतीयांना मार्गदर्शन करणाऱ्या भगतसिंहांचा हा भारत आहे का,ही शंका येते.


राजकारणात धर्म,जात या गोष्टींना स्थान असू नये,केवळ विकासाचे राजकारण करावे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या भगतसिंहाने काही उदाहरणे समोर ठेवली आहेत.तो सांगतो,

"धर्मास अंधश्रद्धा आणि अंधविश्वासाची जोड असेल तर तो धर्म भिरकावून देणे उत्तम.धर्म,रंग,जात आणि देश यापलीकडे जाऊन लोकांची एकजूट होणे आणि आर्थिक स्वातंत्र्य कमवणे आवश्यक."


भारताच्या राजकारणातील धार्मिकतेचा वापर कसा केला गेला,याविषयी भगतसिंह फार सुंदर लिहीतो.

गदर पार्टीसारख्या क्रांतिकारकांची या देशाला गरज आहे,असे सांगत तो म्हणतो,

"धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक,ऐच्छिक बाब आहे म्हणून त्यात इतर कुणीही ढवळाढवळ करू नये.ही गोष्ट गदर पार्टीच्या क्रांतिकारकांनी जाणली होती.म्हणूनच धार्मिक राजकारण मध्ये न आणता एकजुटीने काम करणे सर्वांना शक्य झाले."

अशी भूमिका घेणाऱ्या सर्व क्रांतिकारकांचे भगतसिंह अभिनंदन करतो आणि भारतातल्या तरुणांना गदर पार्टीच्या विचारांचा आदर्श घ्यावा याविषयी सांगतो.


अजून एक गोष्ट.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा पक्ष.या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कित्येक समिधा अर्पन केल्या.परंतू वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना व्यासपीठावर स्थान देऊन,कुराण व मंत्र पठण करू देणाऱ्या,सर्वधर्म समभाव नावाखाली सगळ्या धर्मांना मोकाट सोडणाऱ्या संधीसाधू राष्ट्रीय काँग्रेसच्या धार्मिक ध्येयधोरणांवर तो टीका करतो.

वसाहतवादापेक्षा 'जमातवाद' हाच भारताचा मोठा शत्रू आहे हे भगतसिंहास माहिती होते आणि त्याचमुळे धर्म आणि अंधश्रद्धेच्या बंधनातून मुक्त होण्याची गरज भगतसिंहाला वाटत होती.

'काँग्रेसवर टीका करणारे भगतसिंह' मांडणारे 'सोयीचे' राजकारणी मात्र भगतसिंहाने 'आधुनिक दृष्टिकोन' ठेवणाऱ्या नेहरूंविषयी काढलेले उद्गार मात्र सांगायला विसरतात.

" आधुनिक समाजवादी मूल्यांवर आधारलेल्या नेहरूंच्या विचारसरणीचे डोळसपणे पंजाबच्या तरुणांनी अनुकरण करावे " हा त्याचा सल्ला सोयीस्कररित्या डोळेझाक केला जातो.(संधीसाधू राजकारणी किती घातक याचेच हे उदाहरण)


राष्ट्रीय नेतृत्व असणाऱ्या लालजींनी एकदा असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस (1924) हिंदुत्ववादी भूमिकेचा पुरस्कार केला होता.तेव्हा लालजींविरोधात भगतसिंहने एक पत्रक काढले आणि त्यात लिहीले 'पंजाब केसरीचे हृदय कोंबडीचे झाले.' फक्त पत्रक काढूनच तो थांबला नाही,तर जिथे लालाजींची सभा होती त्याजागी भरसभेत ही पत्रके त्याने वाटली.अर्थात,तिथे असलेल्या लालाजींच्या काही कार्यकर्त्यांसोबत हातापायी झाली,नंतर लालाजींनी त्यांचा उल्लेख 'माझीच नालायक मुले आहेत' असा केलेला उल्लेख आणि 'त्यांनी नेता गमावला असेल पण एक शिपाई त्यांना गवसला आहे' हे लालाजींनी काढलेले उद्गार.. एका राष्ट्रीय नेत्याने कसे राजकारण करावे आणि कसे करू नये हे सांगण्यासाठी भगतसिंहाने केलेला अट्टाहास.देशपातळीवर पोहोचलेल्या या राष्ट्रीय नेतृत्वासोबतच लहानाचे मोठे झालो आहोत,त्यांच्या विरोधात गेल्यास त्यांना काय वाटेल इत्यादी गोष्टीचा भगतसिंहने विचार केला नाही.धर्माचे राजकारण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीची भारताच्या तरुणांवर किती वाईट परिणाम होतील याची जाणीव त्याला होती.


धर्म,राजकारण,जात,अंधश्रद्धा..फक्त याबद्दल भगतसिंहने कित्येक लेख लिहीले आहेत.पण आजच्या तरुणाला भगतसिंह आठवत नाही.नाक्यावरच्या एखाद्या पाटीअध्यक्षाचा सल्ला त्याच्यासाठी लक्ष्मणरेषा असते.तरुणांमध्ये धार्मिक द्वेष तयार करायचे,दंगे घडवून आणायचे आणि त्याच गोष्टींवर आपले राजकारण साधायचे.पण ययामुळे भारताचा भाग्यविधाता असणाऱ्या तरुणांचे आयुष्यच अंधारात ढकलले जाते,याची कल्पना भगतसिंहाला 90 वर्षाआधीच होती.

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter