IMAGE COURTESY : Source
Source: lux235
महायुद्ध म्हणजे या दुनियेने भोगलेलं अतीव कष्टदायी काळ.
बर्लिनच्या भिंतीचे पतन...!
महायुद्ध म्हणजे या दुनियेने भोगलेलं अतीव कष्टदायी काळ. या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही. अनेक दशकांची, कारणांची, कुरघोड्यांची कारण मीमांसा यासाऱ्यांच्या आड लपलेली आहे.
महायुद्ध घडलं, आपल्या पेक्षा साऱ्याच बाबत सरस असणाऱ्या कितीतरी राष्ट्रांना एकाचवेळी अंगावर घेऊन, आपल्या लिंबूटिंबू मित्रांसोबत जर्मनीने दुसरे महायुद्ध गाजवलं, जर्मनी हरली, मित्र राष्ट्रांपुढे त्यांनी सपशेल शरणागती पत्करली. पण जेवढा काळ हे जर्मन लोक रणात झुंजत होते, त्यावेळी सारी दुनिया विस्फारलेल्या नजरेने त्यांचा रणगाजीपणा अनुभवत होती.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं मित्र राष्ट्रांच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली. या मैत्रीच्या समीकरणात ब्रिटन, अमेरिका, फ्रांस आणि सोव्हिएत युनियन असे मातब्बर देश होते. तेव्हा पूर्व युरोपातील देशांचा रशियाच्या नेतृत्वात एक संघ होता. आता जेते आहेत म्हटल्यावर त्यांना त्यांच्या मनासारखं करण्यावाचून रोखणार ते कोण ? त्यात संपूर्ण शरणागती पत्करलेल्या राष्ट्रांना कितीही काहीही मानहानी, अपमानकारक नियम अटी व वागणुकीला सामोरे जावे लागले तरी त्यांना मुग गिळून शान बसावंच लागतं. जर्मनीचेही तेच झाले.
विजयी देशांनी मग जर्मनीला विभागून एकेका प्रांतावर नियंत्रण मिळवण्याचं ठरवलं. जर्मनीचा पश्चिम भाग ब्रिटन, अमेरिका, फ्रांस, तर पूर्व भाग सोव्हिएत संघाकडं गेला. तसं बर्लिन हे शहर सोव्हिएत संघाकडं होतं, पण ते राजधानीचं शहर होतं. त्यामुळं बर्लिनचे चार भाग करून चार देशांकडं (अमेरिका, फ्रांस, ब्रिटन आणि सोव्हिएत संघ) द्यायचा निर्णय झाला.दरम्यान, सोव्हिएत संघाकडील जर्मन लोकांना वेगळीच वागणूक मिळाली.
1949 मध्ये जर्मनीचे दोन स्वतंत्र देश झाले. मित्र राष्ट्रांच्या नियंत्रणातल्या पश्चिम जर्मनीला 'द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी' म्हटलं गेलं. सोव्हिएत संघाच्या ताब्यातल्या पूर्व जर्मनीचं 'जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक' असं नामकरण करण्यात आलं. पश्चिम जर्मनीतील लोक मुक्तपणे देशात फिरू शकत होते, त्यांच्यावर बंधनं अशी विशेष काही नव्हती, माणसाला माणसा प्रमाणे वागण्याचा नैतिक हक्क त्यांना मिळाला होता, त्यांना स्वत:चे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य होतं. पण, पूर्व जर्मनीतील लोकांवर अनेक बंधनं होती. कसं वागावं, काय ऐकावं, कुठं फिरावं, याचे जाचक नियम होते. काही वर्षांतच पूर्व जर्मनीतील हजारो लोकांनी पश्चिम जर्मनीत पलायन करण्यास सुरुवात केली.
1961मध्ये सोव्हिएत संघाचे अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांनी पूर्व जर्मनीतील लोकांचं वाढतं स्थलांतर थांबवण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्यात भिंत बांधण्याचं ठरवलं. 13 ऑगस्ट 1961च्या एका रात्रीत अचानकपणे या भिंतीचं बांधकाम हाती घेण्यात आले. एखाद्या महत्वकांक्षी प्रकल्पाप्रमाणे या कामाला आवर होता. कारणही तसच होतं. बर्लिनची भिंत बांधण्यापुर्वी १९४५ ते १९६१ दरम्यान अंदाजे ३५ लाख पूर्व जर्मन नागरिकांनी पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले होते होते. ही भिंत बांधल्यानंतर हे पलायन जवळजवळ संपुर्णपणे संपुष्टात आणण्यात आले होते. ही भिंत पुढे पूर्व आणि पश्चिम युरोपच्या फाळणीचं प्रतीक बनली. तिला 'लोखंडी पडदा' असं म्हटलं जाऊ लागलं.
1961 ते 1989 दरम्यान भिंत ओलांडताना 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. पूर्व जर्मनीतील लोकांच जीवन खूपच हलाखीचं होतं. सोव्हिएत संघाच्या ताब्यातील पूर्व युरोपातील देशांमध्ये लोकांवर असलेल्या बंधनांविरोधात, 1980च्या दशकात असंतोषाची ठिगणी पेट घेऊ लागली. पूर्व जर्मनीतील लोकांनी हवं तिथं जाण्याचं, राहण्याचं, आवडतं संगीत ऐकण्याचं आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलनं सुरू केली. जर्मनीतील नागरिकांची निदर्शनं वाढत गेली, तशी त्यांची देशाबाहेर जाण्याची मागणीही वाढली. पूर्वेकडील लोक हंगेरी आणि झेकोस्लोव्हाकियामार्गे पश्चिम जर्मनीत पळून जाऊ लागली.
शेवटी पूर्व जर्मनीच्या सरकारला लोकांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं. मग 9 नोव्हेंबरला पूर्व जर्मनीच्या एका नेत्यानं टीव्हीवर भाषण करताना, बर्लिन भिंतीचे दरवाजे लवकरच उघडण्यात येतील, अशी घोषणा केली. त्याच रात्री पूर्व जर्मनीतील लोक भिंतीजवळ जमा झाले. भिंतीचे दरवाजे उघडण्याची मागणी करू लागले. सुमारे 10.45 वाजता लोकांनीच दरवाजे उघडले आणि पश्चिम जर्मनीत प्रवेश केला. तो ऐतिहासिक क्षण! दोन्ही जर्मनीतील हजारो लोक या क्षणाची वाट पाहत होते. शेवटी दारं उघडली आणि गळाभेटी झाल्या. त्या दिवशी लोक भिंतीवर चढून नाचले.
9 नोव्हेंबर 1989 या दिवशी बर्लिनची भिंत पाडायला सुरुवात झाली होती. ते काम काही दिवस असच अविरतपणे सुरु होतं. सरकारनं ही भिंत 1990 मध्ये पाडायला सुरुवात केली. भिंतीचा काही भाग आठवण म्हणून अजूनही ठेवण्यात आला आहे. इथून पुढेच जर्मनीच्या एकीकरणाच्या कारभाराला हाती घेण्यात आले.
Share on: