IMAGE COURTESY : Source
Source: Facebook
अपरिचित महात्मा….!
आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक म्हणून समजाला महात्मा ज्योतीराव फुले यांची ओळख आहे. सामाजिक विषमतेचे जागतिक भान महात्मा फुले यांना होते, याचा प्रत्यत आपल्याला त्यांनी आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला यातूनही होतो. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
मुळात समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे ज्योतिरावांनी ओळखले. एक स्त्री सुशिक्षित म्हणजे पुढच्या सर्व पिढ्या सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी केली. १८४८ साली हिंदुस्थानातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे त्यांनी सुरू केली.
परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांनी १८६४ साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. एखाद्या विधवेला दुर्दैवी परिस्थितीत संतती झाल्यास त्या विधवेस भ्रूणहत्या किंवा आत्महत्येशिवाय पर्याय राहत नसे. ही समस्या ओळखून त्यांनी १८६३ साली पुण्यात पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले. त्यांनी याच प्रतिबंधक गृहातील एक मुलगा दत्तक घेतला. यावरूनच त्यांचे स्त्रीविषयक विचार किती आधुनिक व पुरोगामी होते हे स्पष्ट होते. ईश्वरासाठी त्यांनी नेहमीच निर्मिक हा शब्द वापरला.
शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी 'शेतकर्यांचा आसूड' या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्यांच्या वेषात शेतकर्यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.
'निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा त्यांचा सत्यधर्माचा व मानवताधर्माचा संदेश आजही अनुकरणीय ठरतो.
खालच्या ओळीत असलेले जुने फोटो अनुक्रमे
(१) भिडे वाड्यातील पहिली मुलींची शाळा,
(२) हरिजनांसाठी खुली केलेली विहीर व
(३) अहिल्याश्रम.
संकलित मुद्दे वेगवेगळ्या लिंक्सवरून गोळा केले आहेत