IMAGE COURTESY : Source
Source: Pinterest
माहाराज छत्रपती सबाजी राजे पातशाह: जुडी उनोकु येक कतबत वा हेबीज भेज देकर
"माहाराज छत्रपती सबाजी राजे पातशाह: जुडी उनोकु येक कतबत वा हेबीज भेज देकर उनोका कूच घोडा मगाकर मोगलापर च्याल देणा.."
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज अजस्त्र सेनासागर घेऊन दक्षिणेत उतरले. कर्नाटकच्या स्वारीत शिवरायांना 'न भूतो न भविष्यती' यश लाभले. शिवाजी महाराज जेव्हा हैद्राबादमध्ये पोहोचले तेव्हा कुत्बशहाने त्यांचे भव्यदिव्य स्वागत केले. कुत्बशहाने सारे शहर सजवले होते. शहरातील सर्व गल्ल्या-रस्ते कुंकू आणि केशरच्या सड्याने भरून गेले होते. सर्वत्र स्वागताच्या कमानी आणि उत्सवाच्या काठ्या (गुड्या) उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे दर्शन सर्वसामान्य लोकांना सुद्धा घेता यावे, म्हणून मोठमोठाल्या मचानी उभारण्यात आल्या होत्या. शहरातल्या सर्व स्त्रियांनी मंगलदिपकाने शिवाजी महाराजांना ओवाळले. सोन्या-चांदीच्या फुलांची उधळण महाराजांवर होत होती. सोन्याचांदीने, रत्नाने भरलेल्या तबकांचा ओघ कुत्बशहाने सुरूच ठेवला होता. 'चक्रवर्ती सम्राट' म्हणून शिवरायांचा योग्य तो मानपान कुत्बशहाने राखला. शिवाजी महाराजांसोबत मैत्री कायम ठेवण्यासाठी त्याने जिंजीचा भाग सोडण्याची तयारी दाखवली. बदल्यात मराठ्यांसारखा प्रबळ मित्र त्याने कमवला.
शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर आले. आपल्या पराक्रमी पित्याप्रमाणेच त्यांनी साऱ्या दक्खन भूभागावर रणतांडव माजवला होता. संभाजी महाराजांना रोखणे ना मुघलांना शक्य झाले.. ना पोर्तुगीजांना.. ना सिद्दी ना इंग्रजांना.. अखेरीस औरंगजेबाला आपला मोर्चा दक्षिणेतल्या आदिलशाही आणि कुत्बशाहीकडे वळवावा लागला.
याचदरम्यान कुत्बशहाकडे औरंगजेबाने वकील हजरत मीर दौलत यास पाठवले. 'मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी आमच्यासोबत या' असा प्रस्ताव कुत्बशहासमोर मांडला. जो त्याने अतिशय कणखरपणे धुडकावून लावला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. औरंगजेब आदिलशाही आणि कुत्बशाहीच्या विरोधात उतरला. याच प्रसंगी कुत्बशहाने सिकंदर आदिलशाहला धीर देणारे एक पत्र लिहिले. मूळ पत्र दक्खनी हिंदीतून आहे. थोडक्यात त्या पत्राचा सारांश पुढीलप्रमाणे,
"औरंगजेबाच्या वकिलाने, मीर दौलत याने सांगितले की आम्ही मुघलांनी दक्खनेच्या पातशाह्यावर राज्य केलं आहे. आता मराठा राजा छत्रपती संभाजी याच्याशी युद्ध सुरू आहे. चार लाख घोडा घेऊन दिलीरखान आणि रणमस्तखान त्याच्यावर चालून गेले आहेत. तुमचे घोडदळ आणि फौज आमच्या मदतीसाठी दिली तर ठीक अन्यथा तुमच्याविरुद्ध युद्ध करू. आम्ही उत्तर दिले, की आमची पातशाही आणि दक्खनची पातशाही यात फरक नाही. त्यांच्याशी युद्ध म्हणजे आमच्याशी युद्ध…."
पुढे कुत्बशाह लिहीतो,
"महाराज छत्रपती संभाजी राजे पातशाह यांच्याकडे हेजीब पाठवून त्यांचे घोडदळ मागवून घ्या आणि मुघलांवरती चाल करा. गनिमाला मारून त्याचा फन्ना उडवायचा आहे. आम्ही तयारी करून स्वतः गुलबर्ग्यास येत आहोत, तुम्हीही या. संभाजीसुद्धा येत आहेत. आपण तिघे मिळून मुघलाई जिंकूया.."
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर विश्वास ठेवून निर्धास्तपणे औरंगजेबाला, त्याच्या प्रस्तावाला उडवून लावण्याचे धैर्य दाखवणाऱ्या कुत्बशाहचे हे पत्र म्हणजे मराठ्यांच्या अफाट ताकदीवर असलेल्या विश्वासाचे प्रतीकच म्हणायला हवे. शिवछत्रपतींनी दक्षिणेतल्या सर्व पातशाह्यांना एकत्र करण्याचा घेतलेला निर्णय किती दूरदर्शी ठरला, हेसुद्धा यातून समजते. एवढंच नव्हे, तर मूळ पत्रात संभाजी महाराजांचा उल्लेख 'माहाराजा छत्रपती सबाजी राजे पादशाह' असा करण्यात आला आहे. कुत्बशाहचा संभाजीराजेंविषयी असलेला आदर यातून स्पष्ट होतो. दोन बलाढ्य राजे, त्यांचे साम्राज्य हे मराठ्यांच्या मदतीवर अवलंबून होते. छत्रपती संभाजीराजेंच्या सोबतीमुळे आदिलशाही आणि कुत्बशाही औरंगजेबाच्या विरोधात मैदानात उतरली. खुद्द कुत्बशाह ' आम्ही औरंगजेबावर चाल करून जाणार आहोत, तुम्हीही तयारीनिशी या' एवढ्या आत्मविश्वासाने सिकंदर आदिलशाहला कळवत होता. 'गनिम कु मारकर फना करणा है..' असं म्हणणाऱ्या कुत्बशाहचा आत्मविश्वास आपल्याला ठळकपणे दिसून येतो..
सर्व काही नष्ट होण्याच्या मार्गावर असतानासुद्धा जिवंत राहण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा 'छत्रपती सबाजी राजे पादशाह' हा दोस्त कुत्बशाहसोबत होता.. त्यामुळेच ही दोन्ही राज्ये मराठ्यांच्या मदतीने औरंगजेबाविरोधात उतरली. पुढे जे घडले, ते दक्षिणेत झालेलं महाभयंकर महाभारत ठरले.
मुर्दाड जीवामध्येसुद्धा लढण्याची गुर्मी तेवत ठेवणाऱ्या महाबलाढ्य छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा..
पेंटिंग : गोवळकोंड्यावर औरंगजेबाने केलेला हल्ला.
Share on: