IMAGE COURTESY : Source
Source: Wikipedia
मंदिराच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे.पाच फुटी,आठ हातांच्या महिषमर्दिनीने गेली कित्येक दशके अभ्यासकांना वेड लावले आहे.
दुर्ग मंदिरातील जगप्रसिद्ध महिषासुरमर्दिनी आणि नावामागील गम्मत
मंदिराच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे.पाच फुटी,आठ हातांच्या महिषमर्दिनीने गेली कित्येक दशके अभ्यासकांना वेड लावले आहे.उजव्या हातात त्रिशुळ,तलवार,चक्र यांसारखी आयुधे तर डाव्या हातात केवळ घंटा आणि शंख हीच आयुधे दिसून येतात.प्रतिमा एवढी सुंदर आणि एवढी आखीव रेखीव आहे,की आजही जगभरातले पर्यटक आणि अभ्यासक मंदिर पाहायला दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.
खरेतर,ह्या महिषासुर मर्दिनीचे चालुक्य शैलीतील स्थित्यंतरे अभ्यासणे हा फार मजेशीर विषय आहे.बदामी येथील लेणी क्र.1 येथे असणारी महिषासुर मर्दिनी अतिशय साधी,चार हातांची.खाली असुर केवळ म्हशीच्या स्वरूपात दाखवला असून,त्याच्या गळ्याच्या आरपार गेलेले त्रिशुळ एवढेच काय ते दर्शवले आहे.
पुढे रावनफाडी (ऐहोळे) इथल्या लेणीत असणारी महिषासुरमर्दिनी अष्टभुजाधारी आहे.पण इथे मात्र महिषासुराची मान मागे मुरगळून,गुढग्याने त्यावर आपला सारा भार टाकून दुर्गेने त्याच्या पाठीतून त्रिशूलाचे टोक आरपार केल्याचे दिसते.आणि याच महिषासुरमर्दिनीचे पूर्ण विकसित,सुंदर आणि परिपूर्ण रूप दुर्ग मंदिरावर कोरल्याचे दिसून येते.इथेही असुर केवळ म्हशीच्या स्वरूपात दाखवला असून,त्याच्या छातीतून आरपार गेलेला त्रिशुळ आणि शेजारी आक्रमक झालेला सिंह आणि देवीचे विलोभनीय रूप.एवढी सुंदर प्रतिमा (त्याकाळात निर्माण केलेल्या) इतर कोणत्याही मंदिरावर दिसून येत नाही.
पण,मज्जा अशी आहे की एवढे एक शिल्प सोडले,तर इतर कोणत्याही देवीची प्रतिमा मंदिरावर शिल्पीत केलेली नाही.महिषमर्दिनीचे शिल्पही मंदिराच्या बाहेरील बाजूस आहे.गर्भगृहात असणारी मुख्यदेवता ही सूर्य,विष्णू की सूर्यनारायण याविषयी अभ्यासकात मतभेद आहेत.पण,सदर मंदिर हे दुर्गादेवीस समर्पित नाही,एवढे नक्की.मंदिर फार सुंदर आहे.चालुक्यांनी सुरुवातीच्या काळात जी 'बांधीव मंदिरे' उभारली,त्यामध्ये दुर्ग मंदिर हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.तोरणांचा वापर सर्वात पहिल्यांदा याच मंदिरावर करण्यात आला.मंदिरावरील कलाकुसर अप्रतिम आहे.खांबांची रचना,त्यावरील भौमितिक सजावट आणि शिल्पे बदामी येथील लेण्यांची आठवण करून देतात.
मराठ्यांनी कर्नाटकात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.एकेकाळी चालुक्यांची राजधानी राहीलेल्या ऐहोळे गावात मराठ्यांनी आपली घोडी दामटली. ऐहोळे गावचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बदामी चालुक्यकाळापासून गावास तटबंदी उभारण्यात आली होती.पुढे जाऊन हे बांधकाम भक्कम झाले आणि मराठ्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे संरक्षणदृष्ट्या या तटबंदीची डागडुजी केली.यातच,टेहाळणी करण्यासाठी वापरण्यात येतो असा मोठा बुरुज एका मंदिराच्या भग्न छतावर उभारण्यात आला.फार मोठ्या बुरुजाचे बांधकाम मंदिरावर केल्यामुळे,मंदिरास नाव पडले 'दुर्ग मंदिर'.पुढे अपभ्रंश झाला आणि मंदिराचे नाव झाले 'दुर्गा मंदिर' जे आजतागायत प्रचलित आहे.जेव्हा सर्वप्रथम जेम्स बर्गेस हा या भागात गेला (साधारण 145 वर्षांपूर्वी) तेव्हा स्थानिक लोकांनी दिलेली ही माहिती,त्याने मंदिराची व परिसराची झालेली दुरावस्था सर्वकाही नोंदवून ठेवले.मंदिराच्या छतावर उभारण्यात आलेल्या बुरुजाचे छायाचित्र आणि एक रेखाचित्रही त्याने काढून ठेवले.आज जर प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहीले, तर बुरुजाचा साधा अवशेषही दिसत नाही.उलट पुरातत्व खात्याने दुर्ग मंदिर परिसरात लॉन्स तयार केले आहेत,संग्रहालय आहे,विखुरलेल्या अवशेषांना एका बसक्या चौथऱ्यावर ठेवून जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.परिसराचे एवढ्या सुंदर पद्धतीने सुशोभीकरण केले आहे की मन अगदी प्रसन्न होते.इकडे महाराष्ट्रात मात्र त्याच तोडीचे बांधकाम असणाऱ्या आपल्या ऐतिहासिक वास्तूंकडे होणारे दुर्लक्ष पाहून विषण्णताही पसरते.
असुरांचे निर्दालन करणारी आणि सामर्थ्याने भक्तांचे रक्षण करणारी..महिषासुरमर्दिनी.
Share on: