एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: wikipedia

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक

महाराष्ट्रावर नियतीने केलेले अनंत उपकार म्हणजे, समस्त भोसले कुळीचा या भूमीला लाभलेला सहवास होय. महाराजा शहाजी महाराजांच्या तलवारीची धमक त्यांच्या पुढील पिढ्यांना आपल्या कवेत संपूर्ण राष्ट्र घेण्याची प्रेरणा देती झाली आणि या भोसले कुळीने राष्ट्राच्या इतिहासात आपला अजरामर ठसा उमटविण्याचे काम केले. याच कुळातील एक महत्वपूर्ण पर्व आणि आवर्जून अधोरीखित करण्यासारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे लोकराजा राजर्षि शाहू महाराज होय. 

26 जून इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात शाहू महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होय. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. 1889 ते 1893 या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी राजे विवाहबद्ध झाले. यावेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते. 

यानंतर 3 वर्षानी म्हणजेच 2 एप्रिल 1894 साली शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक समयी शाहू महाराजांनी आपला पहिलाच जाहीरनामा काढताना राज्याभिषेक शकाला आपल्या राजपत्रात मानाचे स्थान दिले. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्यात पुष्कळ साम्य दिसते. शाहू महाराज ,शिवाजी महाराजांचा केवळ वारसा सांगणारे नव्हते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा ठसा त्यांच्या मनावर उमटला होता, शाहू महाराजांच्या काळात या देशात इंग्रजी सत्ता दृढमूल होती यामुळे महाराजांना आपले कार्य करत असताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. असे अनुकूल वातावरण नसतानाही राजेंनी आपले कार्य मोठ्या नेटाने पूर्णत्वास न्हेले. महाराजांनी आपल्या शासकीय अशा पहिल्याच जाहीरनाम्यात स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या राज्याभिषेक शकाचा वापर केला. जो मायना छ. शिवाजी महाराजांनी स्विकारला तो अगदी जसाच्या तसा शाहू महाराजांनी घेतला. 

'स्वस्तिश्री राज्यभिषेक शके २२० विजयनाम संवत्सरे फाल्गुन वद्य ११, इंदुवासरे क्षत्रीयकुलावतंस श्री. राजा शाहू छत्रपती स्वामी इ. इ.' 

या जाहीरनाम्याच्याव्दारे कोल्हापूर इलाख्यातील आमच्या तमाम प्रजाजनांस जाहीर करण्यात येते की, आजपर्यन्त आम्ही अल्पवयी असल्या कारणाने कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार "कौन्सिल ऑफ अँडमिनिस्ट्रेशन" यांच्या हातून चालविण्यात येत होता. परंतू आता आम्ही प्रौढावस्थेत आल्याकारणाने आज रोजी त्यांची कारकीर्द संपून आमच्या राज्याचा पुर्ण अखत्यार आमच्या हाती आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आज तारीख दोन माहे एप्रिल इसवी सन एक हजार आठशे चौर्‍याण्णवपासून तो चालविण्यास सुरुवात केली आहे.   

आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृध्दी व्हावी व आमचे संस्थानची हरएक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू पुर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहानथोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदी करुन तमाम प्रजाजन शुध्द अंत:करणापासुन मोठ्या राजनिष्ठेने आम्हांस साहाय्य करतील, अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दीघकालपर्यंत चालवून सफल करावी.

हा राजेंचा पहिला जाहीरनामा होय. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. या 28 वर्षांच्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी आपला द्रष्टेपणा कर्तृत्वातून दाखवून दिला. त्यांनी औद्योगिक, कृषी, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. 'अज्ञानाचे व गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही' हा विचार मांडून त्यादृष्टीने भरीव योगदान त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात दिले. केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील शिक्षणक्षेत्राला सकारात्मक दिशा देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आणि अमूल्य म्हणता येईल असेच आहे.

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter