IMAGE COURTESY : Source
Source: Gemini (AI Generated)
दक्षिण आफ्रिकेचा सह्याद्री - ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग
आफ्रिका हे नाव ऐकताच आपल्यासमोर उभे राहते ते क्षितिजाला जाऊन भिडलेले विस्तीर्ण जंगल, अतिशय समृद्ध अशी जैव विविधता, जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा, टांझानियातील माऊंट किलीमांजारो, केप ऑफ गुड होप, सहारा वाळवंट, सुदान, इथोपिया, युगांडा सोमालियातील धुमसते वर्तमान, दक्षिण आफ्रिकेतील पाण्याचे दृभिक्ष अशा अनेक गोष्टी स्मृती पटलावर तरळून जातात. याच आफ्रिका खंडातील दक्षिणेकडील देश दक्षिण आफ्रिकेतील एक पर्वतरांग देखील अशीच काहीशी प्रसिद्ध आहे. तिचे नाव ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग.
हा आपल्याकडे या ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग वगैरे फारसे कुणी ओळखत नाही. किंवा या परिसरात माणसे फिरली असली तरी ही अमुख तमुख पर्वतरांग एवढा धांडोळा तेव्हा कोण घेत बसलय. डोळ्याला जेवढी सुखावणारी दृश्ये आहेत ती स्वतःसाठी आपल्या आठवणीत किंवा मोबाईलमध्ये सामावून घ्यायची हीच काय ती प्रत्येकाची पद्धत. पण ही ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग ही दक्षिण आफ्रिकेतील मुख्य पर्वतरांग असून ही पर्वतरांग दक्षिण आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याशी समांतर, नैर्ऋत्य-ईशान्य या दिशेत पसरली असून तिची लांबी १,१२५ किमी. आहे. पर्वताचा विस्तार दक्षिणेस ईस्टर्न केप प्रांतातील स्टॉर्मबर्ग पर्वतश्रेणीपासून उत्तरेस लिंपोपो प्रांतातील वॉकबर्ग पर्वतश्रेणीपर्यंत झालेला आहे. कड्यांच्या सलग मालिका असलेले ग्रेट इस्कार्पमेंट हे दक्षिण आफ्रिकेतील एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिस्वरूप आहे. या भूमिस्वरूपाचा अर्धवर्तुळाकार विस्तार दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनार्याला समांतर झालेला आहे.
आपल्या सह्याद्री प्रमाणेच ज्वालामुखीच्या उद्रेक आणि संचयनातून तयार झालेल्या ड्रेकन्सबर्गमध्ये बेसाल्टचे अच्छादन आढळते. या पर्वतरांगेमुळे दक्षिण आफ्रिकेचा मध्यवर्ती पठारी भाग पूर्व किनाऱ्यावरील मैदानी भागापासून अलग झालेला आहे. ड्रेकन्सबर्गची समुद्रसपाटी पासूनची उंची ३,४७५ मी. पेक्षा जास्त असून दक्षिण आफ्रिकेच्या पोटात असलेल्या लेसोथो देशामधील तबाना एंतलेनयाना (उंची ३,४८२ मी.) हे या रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. याशिवाय माँटोसूर्स (उंची ३,२९९ मी.), जायन्ट्स कॅसल (उंची ३,३१५), शॅम्पेन कॅसल (उंची ३,३७७), अन्जेसुथी (उंची ३,४०८) ही अन्य शिखरे आहेत. या पर्वतरांगेतील सॅनी ही प्रमुख खिंड आहे. डच वसाहतकर्यांनी पाहिलेल्या येथील पर्वतशिखरांना ‘होम ऑफ ड्रॅगन’ किंवा ‘ड्रॅगन माऊंटन’असे संबोधले. त्यावरूनच या पर्वताला ड्रेकन्सबर्ग हे नाव पडले.
या पर्वतरांगेत कॅलडन, तूगेला, ऑरेंज, ईलान्ट्स इत्यादी नद्या उगम पावतात. तुगेला नदी खोल घळईतून वेगाने वाहत असून तिच्या प्रवाहमार्गात प्रपातमालिका निर्माण झाली आहे. ही जलप्रपातमाला 'तूगेला फॉल्स' म्हणून ओळखली जाते. तूगेला धबधब्याची उंची ९४८ मी. असून व्हेनेझुएलातील 'एंजेल' धबधब्याखालोखाल हा जगातील दुसर्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे.
Share on: