IMAGE COURTESY : Source
Source: The Global Marathi
ग्लोबल मराठीचा महाराष्ट्रधर्म
महाराष्ट्रधर्म ह्या संकल्पना जयघोष महाराष्ट्रजणांनी नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत केला .पहिली परिस्थिती इसवी सनाच्या चौदाव्या शतकात .उत्तर कोकणात नायकोरावाने अठरा पगड जाती एकत्र भोजनाला बसवून "महाराष्ट्रधर्माची " संकल्पना मांडली. परकियांचा जुलूम, अन्याय धुडकावण्यासाठी समस्त रयतेला शस्त्रबळाचे आवाहन केले. स्वातंत्र्याचे आणि स्वराज्याचे स्फुल्लिंग महाराष्ट्रातच प्रथमतः निर्माण झाले. त्याची पूर्वपीठिका हि भूतो न भविष्यती होती. उत्तरेच्या कुरू क्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आणि संस्कृतात घुटमळलेला धर्म ज्ञानेश्वर महाराजांनी दख्खनच्या पठारावर मोकळा केला. नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबात मिरवत नेली. जिथे स्त्रियांना मोक्ष नव्हता तिथे महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी भगवंत जात्याजवळ बसवला मुक्ताई, जानाई, सोयरा, कान्होपात्रा देवाला बोलतं करत्या झाल्या. हे सारं फुललं, बहरलं आणि फोफावलं ते सह्याद्रीच्या मुशीत आणि गोदा भीमेच्या कुशीत.
सह्याद्री मुळातचं स्वातंत्र्याचा भोक्ता. त्याचा आडोसा करून इथल्या मातीतल्या लेकरांनी शक क्षत्रप बुडवले. स्वतःचा शालिवाहन शक निर्माण केला. पुलकेशी सारख्या सम्राटाच्या तलवारीचा धाक नर्मदेच्या काठाला होता. महाराष्ट्र जसा शूरांचा तसा तत्वचिंतकांचा. ज्या मतात जे जे महन्मंगल आहे ते ते इथं वाढलं. बौद्धांच्या तत्वज्ञानांची स्मारके थंडगार शैलगृहे म्हणून राहिली, घडली. जैनांना ऐन दुष्काळात महाराष्ट्र जवळचा वाटला त्यांचा आश्रय देताना एकाही महाराष्ट्रीय राजसत्तेचा धर्म आडवा आला नाही. जे जे परागंदा झाले ते ते इथे भरून पावले .चक्रधर स्वामींसारख्या थोर महानुभावांना महाराष्ट्राची सर्वसमावेशकता ठाऊक होती.
गुजरातेतल्या चक्रधरांनी शिष्यांना उपदेश केला "महाराष्ट्रदेशी वसावे" संन्यस्त विद्रोहाचा महाराष्ट्रावरचा केवढा हा विश्वास ..!!
ह्याच महाराष्ट्राच्या छातीवर परकीय सत्ता नांदल्या. त्यांनी दक्षिणेतलं ऐश्वर्य संपवलं. जर्जरी बक्षाच्या नेतृत्वाखाली सातशे सुफी संत दख्खनेत प्रसारासाठी आले त्यांना राजाश्रय होता.पण, नाथपंथीय आणि वारकरी बीजे रूजलेल्या महाराष्ट्राच्या मातीने त्यांचा अध्यात्मिक पराभव केला. इथल्या लोकांना परमार्ग हा कधी रूचला नाही. अन्याय आणि प्रतिकूलते विरूद्ध विद्रोह हा इथल्या मातीचा स्थायिभाव. शिवछत्रपतींच्या रूपाने भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं गारूड उभं राहिलं. एक जात अशी नव्हती कि ज्या जातीने स्वराज्यासाठी हत्यार हाती धरलं नव्हतं. इराण पर्यंतच्या सत्तांना ह्या इतिहासाची दखल घ्यावी लागली.पानिपतावर हाच महाराष्ट्र राष्ट्रधर्माला जागणारा एकमेव प्रांत.
इंग्रजांनाही कधी इथे निवांतपणा लाभला नाही. महाराजा यशवंतराव होळकरांची जरबेची दहशत त्यांनी खाल्ली. कोल्हापूरकर भोसले बंडकर्ते झाले. स्वास्थ असं काही इंग्रज साहेबांना लाभू दिलं नाही. ज्या प्रांताचा सर्व समाज जर लढवय्या असेल तर तो प्रांत फार काळ गुलामीत खितपत पडत नाही. सनदशीर राजकारणासोबत सनदशीर समाजकारण इथं उभं झालं. म.फुले, आगरकर, महर्षी कर्वे, महर्षी वि.रा शिंदे, गाडगे महाराज ह्यांच्या विचारसरणीस महाराष्ट्रात लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला.
महाराष्ट्र घडला तो ह्याच महाराष्ट्रधर्मामुळे. आजही ह्या प्रांतात पूर्व, उत्तर आणि दक्षिणेसारखी अराजकता नाही. पंजाब आणि तमिळनाडूसारखी वेगळी राष्ट्रभावना नाही. इतर व्यापारी प्रांतासारखी स्वार्थलोलुपता नाही. आमच्यात अवगुण असेल, वैगुण्य ही असतील पण, त्यावर मात करण्याचं तारतम्य ह्याच महाराष्ट्रधर्माने आम्हाला शिकवलंय ...
ह्याच महाराष्ट्रधर्माच्या मायबोली मराठीने विनम्रपणे सांगितले आहे...!!
जे खळांची व्यंकटी सांडो |
तयां सत्कर्मीं रती वाढो ||
भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||
चला आपल्या वैश्विक महाराष्ट्रधर्माने मराठी ग्लोबल करूया.
Share on: