IMAGE COURTESY : Source
Source: internet
महाराजसाहेब
अवघ्या पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले शिवाजी महाराजांना.. आपल्या प्रांताचा राजा म्हणून महाराष्ट्रातील इतिहासकारांना राजांचा अभिमान असायलाच हवा. त्यामुळे मराठी इतिहासकारांनी शिवरायांवर संशोधन करणे, पुस्तके लिहीणे हे क्रमप्राप्तच.. पण एक बंगाली बाबू उठतो आणि शिवाजी महाराजांवर एक उत्कृष्ट संशोधनग्रंथ लिहीतो.. प्रो. यदुनाथ सरकार त्यांचे नाव.. सुरेंद्रनाथ सेन काय कमी आहेत? खरेतर सुरेंद्र नाथ सेन, डॉ. बाळकृष्ण यांचे आपल्यावर उपकारच म्हणायला हवेत. इंग्रज, डच ,फ्रेंच, पोर्तुगीज यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले, त्यांच्या पराक्रमाची धास्ती घेतली, त्यांच्या राजनीतीचे धक्के अनुभवले.. जर या दोघांनी मूळ लिखाणाचे भाषांतर केले नसते तर हे सगळं कधी आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. डॉ. बाळकृष्ण म्हणजे कमाल इतिहासकार. Shivaji the great हे शिवाजी महाराजांवर लिहिण्यात आलेलं पण सर्वात जास्त दुर्लक्षित राहिलेलं पुस्तक.. कितीतरी परकीय अभ्यासकांना शिवचरित्र संशोधन करण्यास, लिखाण करण्यास आकर्षित करते. किंकेड असतील, डग्लस असेल, सेनगुप्ता, ताकाखाँ, रॉलिंनसन, ग्रँड डफ, इंद्रजी, अगरवाल.. फार मोठी परंपरा आहे.. सर्वांनाच शिवचरित्राने आकर्षित करावे, याचे कारण काय?
महाराष्ट्रात सुद्धा किती राजे होऊन गेले. अगदी बदामी चालुक्य पासून देवगिरीच्या यादवांपर्यंत.. पण जे प्रेम, जी निष्ठा, जो विश्वास, आपुलकी, माया आणि श्रद्धा शिवरायांच्या वाट्याला आली, ती इतर कोणत्याही राजाला साधी अनुभवायला मिळाली नाही, हेच खरे. 'छत्रपती शिवाजी महाराज' या नावाभोवती महाराष्ट्रातील संशोधकांच्या तब्बल तीन पिढ्या खपल्या. तरीही अविरतपणे शिवरायांवर लिखाण होत आहे, होत राहील.
'शिवाजी' या तीन अक्षरामध्ये जादू आहे. म्हणूनच, साडेतीनशे वर्ष लोटली तरी शिवाजी महाराजांवर असलेली निष्ठा कायम आहे. शिवरायांनी आम्हा महाराष्ट्रातील लोकांना पुनर्जीवन दिले, महाराष्ट्र निर्माण केला.. आमच्या अस्तित्वाला बळकटी दिली.
शिवराय प्रचंड मायेचा विषय.. आपुलकीचा विषय.. आदराचा आणि अभिमानाचा विषय. महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रप्रेम शिकवावे लागत नाही.. कारण तानाजी, बाजी, येसाजी, सूर्याजी, कोंडाजीसारख्या अगणित मावळ्यांनी 'राष्ट्रप्रथम' ही आदर्श शिकवण दिली आहे.. राष्ट्राचे संरक्षण हेच आद्यकर्तव्य आहे, असे संस्कार देणाऱ्या राकट देशाच्या राजाला आजही तमाम रयत मुजरा घालते..
दक्खनेचा एकमेव अभिषिक्त सम्राट म्हणून शिवराय साऱ्या दक्षिणेत वावरले.. त्यांच्या केवळ दर्शनासाठी आग्र्यात झुंबड उडाली होती. गोवळकोंड्यात तर कुतुबशाहने साऱ्या शहरभर सोन्याची फुले वाटली होती, जेव्हा शिवाजी महाराज रस्त्यावरून जातील तेव्हा लोकांनी ती सोन्याची फुले उधळून महाराजांचे स्वागत करावे, म्हणून.. सारे रस्ते कुंकवाने भरले.. हजारपेक्षा जास्त स्त्रिया महाराजांचे औक्षण करायला उभ्या होत्या..
छत्रपती शिवराय आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी ताकदवान सम्राट होते. शिवरायांचा राज्याभिषेक साऱ्या भारताच्या इतिहासाला एका क्षणात कलाटणी देऊन गेला. 'शिवशक' तयार करून शिवरायांनी एका युगाची निर्मिती केली. इथे अखंड हयात जाते, आपल्या अस्तित्वाला मजबूत करण्यात.. तिथे एक राजा आपली स्वतःची स्वतंत्र कालगणना सुरू करतो. ही काही साधी गोष्ट नाही..
या एकाच घटनेने बदलणाऱ्या भविष्याचा अंदाज तमाम मराठमंडळींना आला होता.. आणि त्याच भावना आपल्या शब्दामध्ये पकडून कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो,
"मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य नाही जाहली.."
युगपुरुष, युगद्रष्टा, युगनिर्माता, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा..
Share on: