IMAGE COURTESY : Source
Source: Facebook
रायगडावरचा सोहळा नुकताच कुठे पार पडला होता
रायगडावरचा सोहळा नुकताच कुठे पार पडला होता. राज्याभिषेकासाठी सजलेला रायगड देखील काही अंशी तसाच होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही साधी जाली नाही. या छ्त्रपतीला ज्यांनी घडविले जिच्या कुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न निर्माण झाले त्या राजमाता जिजाऊंनी स्वताच्या पुत्राचा राज्याभिषेक सोहळा डोळे भरून पहिला आणि बुधवार दि. १७ जून १६७४ ज्येष्ठ वद्य नवमी रोजी जिजाऊसाहेबांचा पाचाड येथे रात्री दोन प्रहरी मृत्यू झाला.
सर्वांवर आभाळच फाटले. धाय मोकलून रडणारे महाराज साहेब. टाहो फोडलेला सर्व राणीवसा. जणू आभाळच अंगावर कोसळ्याने अवाक झालेले युवराज संभाजी. आणि काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव होऊन किलकिल्या नजरेने भिरभिर डोळ्याने इकडे तिकडे पाहणारे राजाराम महाराज अशी सर्वांचीच अवस्था बिकट झाली होती. दास दासी प्रधान कारकून मावळे साऱ्यांच्याच नजरांना जणू गंगेचा ओघळ लागला होता
पुण्यातील प्रवेशापासून ते रायगडावर आरूढ होई पर्यंत सोबत असेल्या कोणा एका स्वामीनिष्ठाच्या मनातील खालील आठवणी व भावना महाराज आणि जिजाऊ यांच्या कडे आसुसलेल्या नजरेने पहात त्यास सर्व कांही आठवत होते....
जिजाऊंच्या पोटी जन्मलेला एवढ्याशा अंकुराचा महाकाय कल्पवृक्ष झाला होता. सर्वांना दया माया छाया देणारा. एखाद्याच्या नजरेत भरावा इतका मोठा कल्पतरू झाला होता. जिजाऊचा शिवबा आता शिवराय झाले होते. मराठ्यांचे, दिनदुबळ्यांचे, संत सज्जनांचे धर्माचे राज्य निर्माण झाले होते हे झाले कुणाच्या बळावर ? हे झाले त्या माऊली जिजाऊच्या बळावर. तिने घेतलेल्या अथक परीश्रमच्या बळावर माणसे जोडण्याच्या कलेवर, सर्वांना आपले करण्याच्या त्यांच्या जादूवर, गरीबाच्या पोरावर देखील शिवबा सारखे प्रेम करणाऱ्या त्या माउलीच्या अथक परिश्रमावरच स्वराज्य स्थापन झाले.
म्हातारपणामुळे शरीर थकले होते. पण स्वराज्याखातर असलेल्या प्रेमाची धग आणि कार्याची रग मात्र अजून विजली नव्हती. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. अशी प्रतिभा जिजाउंनी निर्माण केली होती. बालवयातच आईचे छत्र गमवलेल्या आपल्या नातवाला देखील त्याच साचात जणू मासाहेबांनी घडविले होते.
बकाल, भंगार झालेल्या गाढवाचा नांगर फिरवलेल्या आपल्या जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरवून दाखवला होता या माउलीने प्रजेला माया लावून आधार दिला रामराज्याची स्वप्ने पाहिले आणि ती सत्यात उतरवण्यासाठी जेधे - बांदलांसारखे हनुमंत - अंगद महाराजांभोवती याच माउलीच्या कर्माने झाले. जिजाऊंनि केलेल्या न्याय निवड्यातून शहाजी राजांचे करारी पण हमखास दिसून येई.
सर्वांवर प्रेम करणारी ही आई जेव्हा रागवायची तेव्हा जणू आकाशातील बिजलीचा प्रखर पणा देखील त्यांच्यासमोर फिक्का असें. तीर्थरूपांच्या अपमानाचे आम्हीं वेढे घेऊ या वाक्यातच त्यांचा प्रखर पण व्यक्त होते. राजे आपल्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर ही जिजाऊ समजून जाईल की आम्हीं पहिल्या पासूनच निपुत्रिक होतो म्हणून पण आमच्या अश्रुने आपली पावले थबकता कामा नये राजे जा आणि खानाचा निपात करा हे करारी जिजाऊंच्या ठायी होते.
शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या जणू भवानी मातेचाच अवतार त्यांनी आयुष्यभर केलेल्या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या.
आणि आज अखेर समाधानाने डोळे मिटले मात्र आमच्या जीवाला घोर लावलात
Share on: